Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्ण करा; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणांना KDMC आयुक्तांचे निर्देश

पावसाळी तयारीसाठी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

प्रत्येक प्राधिकरणाने आपापल्या अखत्यारीतील अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत,असे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज त्यांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकारी वर्गास दिले. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, इतर अधिकारी तसेच एमएमआरडीए, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, वाहतुक व्यवस्था इ. विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका तसेच इतर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि प्राधान्य देवून रस्त्यांची कामे पुर्ण करावीत. पावसाळी परिस्थितीत, दुर्घटना टाळण्यासाठी, अतिधोकादायक इमारती निर्मनुष्य करणेकामी पोलीस प्रशासनाने महापालिकेस सहकार्य करावे, यासाठी अतिधोकादायक इमारतींची यादी पोलीस प्रशासनाला पाठविण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सिसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त केलेल्या यंत्रणांनी त्याबाबतचा अहवाल त्वरीत सादर करावा. सदर कॅमेरे संबंधितांनी दुरुस्त करून द्यावेत अथवा त्यांचा खर्च महापालिकेस अदा करावा, असेही निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. महापालिका मुख्यालयात तसेच प्रत्येक प्रभाग स्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक प्राधिकरणाने आपल्या नोडल अधिकाऱ्याचा दूरध्वनी क्रमांक संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यावा, म्हणजे पावसाळी परिस्थितीत नागरीकांना प्रतिसाद देणे सुलभ होईल, असेही ते पुढे म्हणाले. महावितरणने कापलेल्या झाडांच्या फांद्या त्यांच्यामार्फत उचलल्या जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे, सदर फांद्या महापालिकेमार्फत उचलल्या जात आहेत. सदरचा खर्च महावितरणने महापालिकेस अदा करावा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पावसाळी आपत्कालीन मदतीसाठी KDMC हेल्पलाईन जारी

पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत महापालिका मुख्यालयातील 18002330045 , 

 02512211373 ,

 02512211866 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments