Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याणमध्ये ‘सस्टेनेबल आणि सेफ’ शहर विकासावर चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

शाश्वत शहरासाठी KDMCचे 7 फोकस जाहीर!

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

वेगाने वाढणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहराला शाश्वत आणि सुरक्षित बनवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी यांनी केले. “शहर विकास ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे ठाम मत त्यांनी यावेळी मांडले. कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासावरील चर्चासत्रात कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्षलागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या 7 अत्यावश्यक मुद्द्यांवर आज तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश जाधव, नगरसेविका विजया पोटे यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये शाश्वत आणि सुरक्षित शहर विषयावरील या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराची लोकसंख्या 20-22 लाखांपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख करत, गृहसंकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगितले. “भविष्यातील संकटे टाळण्यासाठी प्रत्येक सोसायटीने या 7 मुद्द्यांवर तातडीने काम करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या *इलेक्ट्रिक सेफ्टी चेकलिस्टचेही* अनावरण महापौर ॲड हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. घरगुती आणि औद्योगिक वीज वापर सुरक्षित करण्यासाठी हे माहितीपत्रक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या चर्चासत्राला महापौर ॲड हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विजया पोटे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते उमेश बोरगांवकर,अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत )प्रशांत भागवत, अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) जगदीश गोरे, महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, इतर अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. कल्याणातील नामांकित गृहसंकुलातील नागरिकांनी या चर्चासत्राला मोठा सकारात्मक प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments