महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र आली होती. यावेळी पालिकेतीत संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी कोकण भवन येथे गट स्थापन केला असून त्याला मनसेने पाठिंबा दिला होता. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांची एकत्रित बैठक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील एकत्र दिसले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील मनसेच्या नव्या कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील एकत्र दिसून आले आहेत. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट देत शुभेच्छा दिल्या असून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्या.
दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या या भेटीमुळे महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. तसेच मनसे आणि शिंदे सेनेच्या जवळीकीची चर्चा सुरू झाली असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केडीएमसीमध्ये मनसे आणि शिंदे सेना यांची युती असल्याने या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. दोन्ही पक्षांतील समन्वय अधिक मजबूत होत असल्याचे संकेत या भेटीतून मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधत कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments