Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

कल्याण–मुरबाड मार्गावर मृत्यूचा सापळा; रायतेजवळ ११ बळी

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 
अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ आज झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काळी-पिवळी प्रवासी जीप आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रवासी जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. धडक इतकी तीव्र होती की वाहनाचा पूर्ण चुराडा झाला असून अनेक जण जागीच मृत्युमुखी पडले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या दुर्घटनेनंतर कल्याण–मुरबाड दरम्यान सुरू असलेल्या खाजगी, अनियमित आणि जीवघेण्या प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुरेशा सार्वजनिक वाहतुकीअभावी नागरिकांना अशा धोकादायक वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कल्याण–मुरबाड प्रस्तावित रेल्वे मार्गाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा रेल्वे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे. सुरक्षित, स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवासासाठी रेल्वे हा एकमेव दीर्घकालीन उपाय असल्याचे मत व्यक्त होत आहे.तसेच, एसटी बससेवा वाढवावी, बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी आणि महामार्गावरील वाहतूक नियंत्रण अधिक कडक करावे, अशा मागण्याही पुढे येत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कल्याण मुरबाड दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून खाजगी वाहतुकीला अभय दिले जात आहे त्यातच गंभीर बाब म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरत असल्याने असे अपघात वारंवार होत आहेत मुरबाड मधील अनेक तरुणांना रोजगार नाही त्यामुळे ते अशा खाजगी वाहतुकीकडे वळले आहेत परंतु त्यावर नियंत्रण नसल्याने अपघाताची मालिका वाढतच आहे एकंदरीतच स्थानिक लोकप्रतिनिधी या बाबीकडे लक्ष देणे आता क्रम प्राप्त झाले आहे विशेष बाब म्हणजे आरटीओ वाहतूक शाखा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची आता समन्वयाची बैठक होणे गरजेचे आहे यावर तोडगा काढणे तसेच कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग लवकरात लवकर युद्ध पातळीवर सुरू करणे काळाची गरज आहे अजून खाजगी वाहतुकीतून किती बळी घ्यायचे असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे

Post a Comment

0 Comments