मध्य रेल्वेच्या कल्याण–नाशिक आणि कल्याण–पुणे मार्गावरील 16 डब्यांच्या मेमू (MEMU) लोकल सेवांना मंजुरी मिळूनही केवळ RDSO (Research Designs and Standards Organisation) च्या उपस्थितीअभावी या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची चाचणी रखडल्याचा गंभीर आरोप सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी वामन महादेव सांगळे यांनी केला आहे. सांगळे यांच्या म्हणण्यानुसार, मध्य रेल्वेचे डीआरएम शलथ गोयल यांच्या कार्यकाळात या 16 डब्यांच्या मेमू लोकल सेवांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, CTPM श्री. अनिल कुमार पत्के यांनी RDSO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीअभावी घाट विभागातील आवश्यक चाचण्या प्रलंबित ठेवल्या आहेत. यासंदर्भात सांगळे यांनी दावा केला आहे की, RDSO चे मंजुरी अधिकारी CEE(RS) श्री. मनीष बापट यांनी कसारा–इगतपुरी घाट विभागात लोकल ट्रेनच्या यशस्वी संचालनाचे पुरावे मागितले आहेत. हे सर्व पुरावे टिटवाळा, इगतपुरी आणि देवलाली येथे उपलब्ध असूनही मंजुरी प्रक्रियेला विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सांगळे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, सुमारे 105 कोटी रुपये खर्च करून चेन्नई येथे 2018 साली तयार करण्यात आलेल्या तीन मेमू लोकल गाड्या RDSO च्या संमतीने आणण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर कसारा–इगतपुरी घाटातील बोगद्यांचे कारण देत या लोकल सेवांना रद्दबातल ठरविण्यात आले.
संबंधित RDSO अहवाल संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अहवालाची प्रत मागविली; परंतु रेल्वे प्रशासनाने ती अद्याप उपलब्ध करून दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयात राज्यसभा खासदार सौ. मेघा विश्राम कुलकर्णी यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन RDSO मंजुरी प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेमंत्र्यांकडून मिळालेले उत्तर विषयास धरून नसल्याचा दावा सांगळे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा सल्ला दिल्याचेही सांगळे यांनी स्पष्ट केले. तांत्रिक बाबींचा उल्लेख करताना सांगळे म्हणाले की, वंदे भारत एक्सप्रेसची रुंदी 12 फूट 2 इंच असताना मेमू लोकलची रुंदी केवळ 10 फूट 2 इंच आहे. तसेच 8 डब्यांची वंदे भारत ट्रेन दोन मोटर कोचवर घाट विभागात धावू शकते, तर प्रस्तावित मेमू लोकलमध्ये चार मोटर कोच आणि 3600 हॉर्सपॉवरची क्षमता असल्याने ती सहजपणे चालविणे शक्य आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे महत्त्व
2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण–नाशिक मार्गावरील जलद आणि परवडणारी रेल्वे सेवा सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगळे यांनी नमूद केले आहे.
प्रकल्पाचे संभाव्य फायदे
- शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत
- ग्रामीण व शैक्षणिक विकासाला चालना
- रोजगाराच्या नव्या संधी निर्माण
- रेल्वेच्या महसुलात वाढ
- नाशिक परिसरातील ताजा भाजीपाला आणि कृषी माल कल्याण-डोंबिवली परिसरात कमी वेळेत पोहोचण्यास मदत
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला तातडीने RDSO मंजुरी मिळावी आणि चाचण्या पूर्ण करून लोकल सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांसह रेल्वे प्रवासी संघटनांकडून होत आहे.


Post a Comment
0 Comments