कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायते गावात भव्य आणि उत्साहपूर्ण शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. ग्रामस्थ मंडळ रायते यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.सकाळी शिवज्योत दौडने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दुपारच्या सत्रात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, लेझीम, पारंपरिक वेशभूषा आणि शिवभक्तांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले.
सायंकाळी आयोजित शिवकिर्तन कार्यक्रमात ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचिते यांनी शिवचरित्राचे प्रेरणादायी पैलू प्रभावीपणे मांडले. त्यांच्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक कीर्तनाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले.
गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती सोहळा यशस्वी केला. मुख्यतः तरुणांच्या आयोजनातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा यातून दिसून आली.“शिवरायांचे विचार आणि आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी शिवजयंती,” असा संदेश आयोजकांनी दिला.एकूणच, रायते येथे शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी झाली असून गावकऱ्यांमध्ये अभिमान आणि प्रेरणेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.


Post a Comment
0 Comments