Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

डोंबिवलीत २७ सप्टेंबरला ‘फलज्योतिष व बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषद'

 ‘प्रश्नांची उत्तरे बाबांकडे नव्हे, विज्ञानाकडे शोधा’; डोंबिवलीत अंधश्रद्धेविरोधी संघर्ष परिषद

 कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

फलज्योतिष, बुवाबाजी, तथाकथित चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक व शोषण याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्ह्याच्या वतीने डोंबिवलीत ‘फलज्योतिष व बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील जोंधळे विद्यासमूहाच्या सभागृहात ही परिषद होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत, अॅड. तृप्ती पाटील, नितीन वानखेडे, मंगल मोरे, हनुमंत देडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुरोगामी विचारांचे लेखक साथी अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘फलज्योतिष : एक थोतांड’ या विषयावर महा-अंनिसच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे कार्यकारी संपादक साथी उत्तम जोगदंड मार्गदर्शन करणार आहेत. ‘बुवाबाजीचे वाढते प्रकार’ या विषयावर बुवाबाजी संघर्ष विभागाच्या मेंटॉर साथी ॲड. रंजना पगार-गवांदे, तर ‘चमत्कारांचे प्रात्यक्षिके आणि त्याचा खुलासा’ या विषयावर महा-अंनिसचे राज्य कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे मार्गदर्शन करणार आहेत.

अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुवाबाजीविरोधात चर्चेला आलेल्या विविध घटनांचा संदर्भ घेत, अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक, मानसिक, सामाजिक किंवा अन्य प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे महा-अंनिसने सांगितले आहे. विशेषतः महिलांना भीती दाखवून, कौटुंबिक किंवा आरोग्यविषयक समस्यांना ‘दैवी कारणे’ सांगून आर्थिक अथवा अन्य प्रकारे शोषण केले जात असल्याचा दावा समितीने केला आहे. श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली तरी श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक व शोषण होऊ नये, यासाठी नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आजारपणात वैद्यकीय उपचार, कायदेशीर प्रश्नांसाठी कायदेशीर मार्ग आणि आर्थिक अडचणींसाठी योग्य आर्थिक सल्ला घेण्याचा संदेश परिषदेतून देण्यात येणार आहे. ‘प्रश्नांची उत्तरे बाबांकडे नव्हे, विज्ञानाकडे शोधा’, असा संदेश देत वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि विवेकवादी विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. अंधश्रद्धा व बुवाबाजीविरोधात काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी परिषदेला उपस्थित राहून चळवळीत सहभागी व्हावे, तसेच नोंदणी करावी, असे आवाहन महा-अंनिस ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments