Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर गुटखा तस्करांवर धडाका; खोणीत ४८ हजारांचा प्रतिबंधित साठा जप्त

 खोणी गावातील निसर्ग हॉटेल चौकात   सापळा रचून कारवाई; भाजी   विक्रेत्याकडून पानमसाला, सुगंधित   तंबाखूसह ४८ हजारांचा साठा जप्त 

 अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे 
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

गुजरात राज्यातील वापी येथून चोरट्या मार्गाने प्रतिबंधक गुटख्याचा साठा आणून तो कल्याण, डोंबिवली परिसरात रिक्षेच्या माध्यमातून वितरित करणाऱ्या भाजी विक्रेता असलेल्या एका तस्कराला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि मानपाडा पोलिसांच्या पथकाने काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव परिसरात अटक केली आहे. या तस्कराकडून सुमारे ४८ हजाराहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित गुटका पथकाने जप्त केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून या विभागाचे अन्न आणि सुरक्षा अधिकारी, निरीक्षक कल्याण, डोंबिवली परिसरात विविध ठिकाणची माहिती काढुन त्यावर छापे टाकण्याची कार्यवाही करत आहेत. शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र देऊन डोंबिवली शहर परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते, हातगाडी चालक, टपऱ्यांमधून गुटखा विक्री करणारे विक्रेते, हाॅटेल्सची स्वयंपाक गृहे यांची तपासणी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शहरात बारकाईने लक्ष आहे. या कारवाईतूनच हा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 गुटखा साठा जप्त 

मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत ढोले यांना गुप्त माहितीगारातर्फे समजले की कल्याण पूर्व भागातून एका रिक्षेतून प्रतिबंधित गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखुचा साठा काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव हद्दीत निसर्ग हाॅटेल चौक भागात नेण्यात येत आहे. ही माहिती ढोले यांनी ठाणे विभागाचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे महेंद्र कोडग यांना दिली. अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी खोणी निसर्ग हाॅटेल चौकात सापळा लावला. ठरल्या वेळेत संबंधित रिक्षा चौकात येताच, पोलिसांनी ती अडवली. त्या बरोबर रिक्षा चालकासह त्यामधील इसमाची तारांबळ उडाली.

 कल्याणचा तस्कर 

रिक्षेत पाठीमागील आसनावर बसलेल्या इसमाने पोलिसांना आपले नाव दिलीप अनिल कुरसुंगे (३७) सांगितले. तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. तो कल्याण पूर्वेतील आनंदवाडी झोपडपट्टी, हनुमान मंदिराजवळ, कोळसेवाडी, कल्याण पूर्व भागात राहतो. शंकर शिवप्रसाद पांडे (३१, रा. आनंदनगर चाळ, आडिवली, काका ढाब्याजवळ) या रिक्षा चालकाने सांगितले, आपणास दिलीप कुरसुंगुे याने भाड्यासाठी चक्कीनाका येथे थांबवले. त्यांच्याजवळील सामानासह त्यांनी आपणास नेवाळी, पलावा आणि मानपाडा येथे प्रवास करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे भाडे घेऊन आपण आलो आहोत. रिक्षेतील गोणी उघडल्यावर पोलिसांना त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, सुंगंधित तंबाखू, रजनीगंधी, जम्बो तंबाखु, तुलसी राॅयल जाफरानी अशी पाकिटे आढळली. हा साठा आपण गुजरात वापी येथुन विक्रीसाठी आणला आहे, अशी कबुली दिलीप याने पोलिसांना दिली. ४८ हजाराहून अधिक किमतीचा हा साठा आहे. हा साठा कोणाकडून आणला. तो ते कुठे विक्री करणार होता याची माहिती देण्यास तस्कराने टाळाटाळ केली. जप्त केलेला प्रतिबंधित गुटखा आरोग्यास अपायकारक असताना, त्याची विक्री, साठा महाराष्ट्रात करण्यास बंदी आहे हे माहिती असुनही दिलीपने ही बेकायदा कृती केली म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र कोडग यांनी अन्न सुरक्षा मानके कायद्याने दिलीप कुरसुंगे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments